"जगण्याची ऊर्जा – जशी भावना, तशी वास्तवता"
आपण प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी
मिळवण्यासाठी धडपडतो. एखादं स्वप्न, नातं, संधी किंवा यश – त्यासाठी आपण मन, मेंदू
आणि शरीर एकवटून प्रयत्न करतो. पण कित्येक वेळा, ज्या गोष्टीसाठी आपण खूप तगमग
करतो, तीच गोष्ट आपल्यापासून दूर जाताना दिसते. आणि कधीकधी, ज्याची आपल्याला फारशी
अपेक्षाच नसते, ती संधी सहज समोर येते. का बरं असं होतं?
ही गूढ वाटणारी गोष्ट खूप खोल आणि
सोपी तत्त्वज्ञानावर आधारित आहे – “जशी भावना, तशी वास्तविकता”. हे तत्त्व नेविल
गोडार्ड यांनी मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, "The feeling of the
wish fulfilled" – म्हणजेच "इच्छा पूर्ण झाल्याची भावना" – हाच
आपल्या वास्तवाचा खरा बीजमंत्र आहे.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी धावपळ
करतो, ती न मिळाल्याची चिंता करतो, तेव्हा आपल्या आत "कमीपणाची" ऊर्जा
तयार होते. आणि हाच संदेश ब्रह्मांडाला जातो – की आपल्याकडे ती गोष्ट नाही. मग
ब्रह्मांड आपल्याला त्याचाच अनुभव पुन्हा-पुन्हा देतं. म्हणजेच, जशी आतली भावना,
तसंच बाहेरचं जग.
पण जेव्हा आपण मनात एखादी गोष्ट आधीच
मिळाल्याचा अनुभव घेतो – तिच्या प्राप्तीचा आनंद, समाधान आणि आत्मविश्वास अनुभवतो
– तेव्हा आपली ऊर्जा पूर्णतेची होते. आणि ही ऊर्जा ब्रह्मांडाला सांगते की,
“माझ्याकडे हे आहे.” मग ब्रह्मांडही त्याचं प्रतिबिंब आपल्याला परत देतं – ती
गोष्ट आपल्यापर्यंत सहज पोहोचते.
हे समजून घेतल्यावर, आपण आयुष्यात
अनेक गोष्टी सहज प्राप्त करू शकतो – पैसा, नातेसंबंध, यश, किंवा स्वप्न. फक्त एक
गोष्ट करावी लागते – "पाठलाग करणं थांबवा, आणि मिळाल्याचा अनुभव
घ्या."
जसं समृद्ध लोक पैशाची चिंता करत
नाहीत, कारण त्यांच्याकडे आधीच भरपूर आहे, तसंच आपणही आपल्या मनाला हे शिकवायला
हवं – "मी ते मिळवले आहे." ही भावना आपल्या मनात खोल रुजली की,
आपल्याभोवतालचं विश्वही बदलायला सुरुवात करतं.